Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राला दिशा देणारा दूरदृष्टीचा मुख्यमंत्री — वसंतराव नाईक!

 

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क


पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.                       महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या पुढे विचार करणारी असतात. हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे त्यापैकी एक महान नेतृत्व.


शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेल्या नाईक साहेबांनी केवळ राज्याचे नेतृत्व केले नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाची मजबूत पायाभरणी केली. कृषी क्षेत्राला आधुनिक दिशा देत महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम करण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेतले. म्हणूनच त्यांचे नाव महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाते.

नाईक साहेबांचा संघर्ष जात-पात, झेंडे आणि राजकीय खंदकांच्या पलीकडे होता. समाजाला विभागणाऱ्या भिंतींपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून आणि प्रबोधनातून मांडला. समाजात कृत्रिम भेद निर्माण करण्यापेक्षा माणुसकी आणि विकासाला प्राधान्य देणे, ही त्यांच्या विचारांची खरी ताकद होती.

त्यांची निर्णय घेण्याची पद्धतही अनुकरणीय होती. शेवटच्या टोकापर्यंत विचार करणे, परिस्थितीचे सर्व पैलू समजून घेणे आणि त्यानंतर निर्णय घेणे, ही त्यांच्या नेतृत्वाची खासियत होती. आजच्या राजकारणातही त्यांच्या या कार्यपद्धतीतून शिकण्यासारखे खूप काही आहे.

नाईक साहेबांची दूरदृष्टी केवळ शेतीपुरती मर्यादित नव्हती. मुंबईतील ‘वर्षा’ हे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून विकसित होण्यामागील संकल्पना आणि मुख्यमंत्री निवासाची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचा दृष्टिकोनही त्यांच्या दूरदृष्टीशी जोडला जातो. आज ‘वर्षा’ हे केवळ निवासस्थान नसून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे नेते म्हणून वसंतराव नाईक यांचे स्थान अढळ आहे. हा केवळ सत्तेचा विक्रम नव्हता; तो महाराष्ट्राच्या कृषी, ग्रामीण विकास आणि प्रशासनाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा प्रदीर्घ प्रवास होता.

आजच्या काळात महाराष्ट्राच्या नेतृत्वाने वसंतराव नाईक यांच्या शेतकरी-केंद्रित दृष्टिकोनाचा, सर्वसमावेशक विचारांचा, संयमी निर्णयप्रक्रियेचा आणि विकासाच्या दूरदृष्टीचा आदर्श घ्यायला हवा. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी असते, हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो.

वसंतराव नाईक यांचे योगदान केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेता त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे, ही मागणी अनेक वर्षांपासून समाजबांधव आणि नाईक साहेबांच्या समर्थकांकडून केली जात आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वाहिलेल्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, हीच भावना आहे.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना  आपण जात-पात, पक्ष आणि झेंड्यांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारे नेतृत्व म्हणजे वसंतराव नाईक.

हरित क्रांतीचे शिल्पकार, महाराष्ट्राच्या विकासाचे दूरदृष्टीचे नायक वसंतराव नाईक साहेबांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!


— नितेश गजानन पवार

देऊळगाव साखरशा, ता. मेहकर, जि. बुलढाणा

संपर्क:+91-9860011185

Post a Comment

0 Comments