Type Here to Get Search Results !

समाजसेवेच्या बळावर राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात — अॅड. माधुरीताई देवानंद पवार यांची बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड..!

 


मेहकर (गणेश पाटील)

मेहकर तालुक्यातील जानेफळ या गावातून समाजसेवेचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या अॅड. माधुरीताई देवानंद पवार यांची नुकतीच बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या हस्ते व श्री. राहुल बोन्द्रे,  आमदार राजेश एकडे, मंगलाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर येथे हा नियुक्तीपत्र सोहळा पार पडला. यावेळी हिवरा खुर्द गावाच्या माजी सरपंच सौ. संगीताताई खरात यांचीही मेहकर कॉंग्रेस महिला तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.  

अॅड. माधुरीताई पवार या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून, त्यांच्या कार्यामुळे त्या संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांनी वडिल देवानंद पवार यांचे विचार अंगीकारत लोकसेवेचा संकल्प घेतला. शालेय वयातच त्यांनी समाजोपयोगी कार्याची गोडी जोपासली. B.Sc, M.A. (समाजशास्त्र) आणि LL.M. अशा उच्चशिक्षणानंतरही त्यांनी सुखसोयीचे जीवन नाकारून आपल्या जन्मभूमीच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले.

त्यांनी राबवलेल्या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची जिल्हाभर दखल घेतली गेली आहे. “महारोग्य शिबिरात” ७,००० रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले गेले, तर “भव्य नेत्रतपासणी शिबिरात” तब्बल १०,००० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. समाजातील अंधश्रद्धा दूर करून “विधवा महिलांना सन्मानाचे जीवन” आणि “तृतीयपंथी मातांना आत्मसन्मानाचे स्थान” मिळवून देण्यासाठी त्यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला.


शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. आत्तापर्यंत त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे वाटप केले आहे. सामाजिक जिव्हाळा जपत दरवर्षी रक्षाबंधनाला मेहकर व लोणार परिसरातील एक लाख भावांना राखी व पत्र पाठवण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे. अनाथ मुलांसाठी त्यांनी विशेष कार्य केले असून, बोथा गावातील चार अनाथ मुलींना घर बांधून देणे तसेच “नित्यानंद अनाथाश्रमातील” ६० मुलांना लागेल ती मदत देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी “मासिक पाळी विषयक जनजागृती मोहिम” राबवली आणि जानेफळ मधील महाविद्यालयात मोफत सॅनिटरी पॅड मशीन व डिस्पोजल मशीन उपलब्ध करून दिले. पर्यावरण संवर्धनासाठी विविध जनजागृती उपक्रम हाती घेऊन त्यांनी नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण केली.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ज्यात  “लोकमत समूह विमेन अचिव्हर अवॉर्ड २०२५”, “माता रमाई पुरस्कार”, “अनाथाची माय सिंधुताई सपकाळ पुरस्कार”, तसेच राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” इत्यादींचा समावेश आहे. 

अॅड. माधुरीताई पवार यांच्या या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात एक तळागाळातील, कार्यक्षम आणि लोकाभिमुख महिला नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा, नवी दिशा आणि नवचैतन्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

समाजसेवेपासून राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास  आहे. 

“सेवा हीच साधना, समाज हीच दिशा” या भूमिकेतून काम करणाऱ्या अॅड. माधुरीताई पवार या नक्कीच बुलडाणा जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहितील असा ठाम विश्वास पंचक्रोशीतील त्यांच्या समर्थकांना आहे.

Post a Comment

0 Comments