मेहकर, *प्रतिनिधी* राज्य शासनाच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक निराधार, ज्येष्ठ नागरिक व गरजू लाभार्थ्यांचे मागील चार महिन्यापासून अनुदान रखडले आहे माहे फेब्रुवारी २०२६ पासूनचे निवृत्ती वेतन अद्याप प्राप्त झाले नसल्याची चर्चा असून त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या योजनेतील लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांचा दैनंदिन खर्च, औषधोपचार, अन्नधान्य खरेदी तसेच इतर अत्यावश्यक गरजांसाठी या मासिक अनुदानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनुदान जमा न झाल्याने अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः वृद्ध, निराधार महिला, दिव्यांग व एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची परिस्थिती अधिक बिकट झाली असून शासनाने तातडीने रखडलेले अनुदान वितरित करावे, अशी मागणी लाभार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
यासंदर्भात संबंधित विभागाकडून अनुदान रखडण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, शासन स्तरावर आवश्यक निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत निराधार योजनेच्या लाभार्थ्याकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments