Type Here to Get Search Results !

*रस्ता नाही, मृत्यूचा सापळा!" – नायगाव देशमुखच्या ग्रामस्थांचा आक्रोश; ७ दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा*

मेहकर(प्रतिनिधी)



, जि. बुलढाणा : "आमच्या गावातील मुलांना शाळेत जाताना भीती वाटते, शेतकऱ्यांना शेतात जाताना जीव मुठीत धरावा लागतो आणि एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत असेल तर त्याला दवाखान्यात पोहोचवण्याआधीच काहीतरी अनर्थ होईल की काय, अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते."


ही वेदना आहे नायगाव देशमुख येथील हजारो ग्रामस्थांची. PMGSY अंतर्गत MH0708 पॅकेजमधील "MDR-45 ते नायगाव देशमुख" हा रस्ता आज विकासाचा मार्ग नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.


सुमारे २१ वर्षांपूर्वी तयार झालेला हा रस्ता आज पूर्णपणे उखडला असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्ता आणि खड्डा यामधील फरकही ओळखता येत नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक नागरिक दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे. अनेक दुचाकीस्वार पडत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे आणि एखाद्या मोठ्या अपघाताची भीती सतत ग्रामस्थांच्या मनात आहे.


ग्रामस्थांचा सवाल आहे, "एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?"


या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका आणि हजारो नागरिक प्रवास करतात. हा फक्त डांबरी रस्ता नाही, तर गावाच्या विकासाचा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि रुग्णांच्या जीवनाचा आधार आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा आधारच आज धोक्यात आला आहे.


ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ७ दिवसांच्या आत प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी देण्याची, कामाची निश्चित तारीख जाहीर करण्याची आणि तोपर्यंत तात्पुरते सुरक्षा उपाय करण्याची मागणी केली आहे.


"आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागत आहोत. सुरक्षित रस्ता हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे." अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.


ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, निवेदन दिल्यानंतर ७ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने बेमुदत उपोषण, आंदोलन आणि इतर लोकशाही मार्गांचा अवलंब केला जाईल. भविष्यात या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.


"आमच्या गावाला विकास नको, फक्त सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार द्या. आमच्या मुलांच्या डोळ्यातील स्वप्ने खड्ड्यांत गाडू नका. एखादा बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, हीच नायगाव देशमुखच्या ग्रामस्थांची आर्त हाक आहेसंयोजक गोपाल महादेव सुरडकर यांचा इशारा


या आंदोलनाचे संयोजक गोपाल महादेव सुरडकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना सांगितले की,


«"नायगाव देशमुखच्या नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. आम्ही वारंवार निवेदने दिली, पाठपुरावा केला, तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता ७ दिवसांच्या आत रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर संविधानिक मार्गाने बेमुदत उपोषण, तीव्र जनआंदोलन आणि लोकशाही पद्धतीने व्यापक लढा उभारला जाईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाच्या निष्क्रियतेची असेल. गावातील एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतर नव्हे, तर आजच प्रशासनाने जागे होऊन काम सुरू करावे. नायगाव देशमुखला सुरक्षित रस्ता मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही." अशी मागणी गोपाल महादेव सुरडकर संयोजक, ग्रामस्थ आंदोलन नायगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा यांनी प्रशासनाला केली आहे

Post a Comment

0 Comments