Type Here to Get Search Results !

*झरपला घराण्याचा राजा काळाच्या पडद्याआड - तो गात होता तेव्हा देवही ऐकायचा, आज देवाने त्यालाच नेलं*

आवाज महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क


*देऊळगाव साखरशा (ता. मेहकर, जि. बुलढाणा) -* बंजारा समाजाच्या काळजाला भिडणारा, ऐकताच अंगावर काटा आणणारा तो बुलंद आवाज आज कायमचा शांत झाला आहे. देऊळगाव साखरशा गावचा कोहिनूर हिरा, सुप्रसिद्ध गायक आणि शिक्षण क्षेत्रातील केंद्रीय प्रमुख राजेश गिरधारी पवार यांचे 19 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अवघा बंजारा समाज पोरका झाला आहे.
 देवाने दिलेला गॉड गिफ्ट आवाज:राजेश पवार यांचा आवाजाचा सूर संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने मिळालेला गॉड गिफ्ट होता. भारतामध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या जवळपास 16 कोटी आहे, पण असा लयबद्ध, तालबद्ध आणि अंगात भिनणारा आवाज देवाने फक्त त्यांनाच दिला होता. त्यांनी गायलेलं गाणं हे फक्त गाणं नसायचं, तर ते समाजाला जागं करणारं प्रबोधन असायचं.
 संत महंत आणि महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवले:
त्यांनी आपली संपूर्ण गायकी समाजासाठी वाहून घेतली होती.
संत सेवालाल महाराज यांच्या 15 फेब्रुवारी जयंतीनिमित्त त्यांनी एका वेगळ्याच सुरात गाणी तयार केली. आई सामकी माता, संत रामराव महाराज, हमुलाल महाराज, गुणवंत बाबा यांच्यावर त्यांनी गायलेली भक्तीगीते आजही पोहरादेवी आणि पूरग्रह येथे भाविकांच्या ओठावर आहेत.
इतकंच नाही तर हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवनपटावर आधारित गाणी गाऊन त्यांनी नाईक साहेबांचे विचार तांड्या-तांड्यावर पोहोचवले. बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांचे गाणे हे काळजावर भिडतात तसेच अंगात लढण्याचे बळ देतात.
 शिक्षक ते मुख्याध्यापक ते केंद्रीय प्रमुख - ज्ञानाची अखंड साधना:गायनाबरोबरच शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी होता. पहिली ते बारावीपर्यंत नेहमी पहिला नंबर मिळवणारे राजेश पवार डी.एड. ला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.
डी.एड. नंतरही त्यांनी शिक्षण थांबवले नाही. त्यानंतर त्यांनी *ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा सखोल अभ्यास* देखील पूर्ण केला होता. ज्ञानाची ही अखंड साधना आणि गुणवत्ता याच जोरावर ते अगदी कमी वयात शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले आणि आपल्या कर्तृत्वावर आधी मुख्याध्यापक आणि नंतर शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे पद असलेले *केंद्रीय प्रमुख* म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले.
 झरपला पवार परिवारावर शोककळा:झरपला म्हणून इतिहासात नोंद असलेल्या पवार परिवारातील एक हिरा आज हरपला आहे. अर्धवट आयुष्य जगून ते गेले, पण या कमी वयातही त्यांनी समाजासाठी जे दिलं ते पुढच्या पिढ्याही विसरणार नाहीत.
आज त्यांचा आवाज आपल्यात नाही, पण त्यांचे विचार आणि त्यांची गाणी आजही आपल्यात जिवंत आहेत.
पवार परिवाराच्या या मोठ्या दुःखातून सावरण्याची शक्ती संत सेवालाल महाराज देवो.

*कै. राजेश गिरधारी पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.*
लेखन:नितेश गजानन पवार, झरपला
मो. न. 9860011185

Post a Comment

0 Comments